Home The Man The Composer Last Years Gallery Contact
For Advertisement on website, Please contact at info@opnayyar.org - We are receiving large no. of hits daily. Advertise with us and promote your business. Book you advertising banner space now !
 


List of All songs
OP Nayyar's A to Z

 


Jadunagri se aya hai koi jadoogar
By Manasi Patwardhanजादू नगरीसे आया है कोई जादूगर......!!!!!

     रसिकमनावर आपल्या धुंद संगीताची मोहोर समर्थपणे उमटविणारा तो जादूगारच होता..लय त्याच्या रक्तातच होती..पंजाबी ठेका नसानसात ठासून भरला होता ..भारतीय तसेच पाश्चिमात्य वाद्यांचा सुंदर मेळ साधून सप्तरंगी संगीताचे इंद्रधनू तो साकारत असे...एकदा हार्मोनियमवर बसला की काव्याच्या अर्थनुसार  निमिषार्धात देखणी धुन तयार होई..ढोलकची थाप,त्याचे चैतन्यदायी संगीत,त्याच्या संगीतातील भारून टाकणारा वाद्यवृंद आणि गीत साकारणारा स्वर्गीय स्वर ...सारेच विलक्षण सुंदर होते...दैवदत्त संगीताची देणगी या जादूगाराला लाभली होती.जणू पूर्व संचित घेऊनच तो जन्मला होता,"सृजन"हेच त्यांचे बलस्थान..."साज "आणि "आवाज "दोन्ही पारखण्यात विलक्षण कल्पकता....!!!एकाच टेक मध्ये त्याचे  गाणे रेकॉर्ड होत असे ,इतका प्रचंड आत्मविश्वास त्याच्यात होता...ज्यांनी "लता" या स्वर्गीय स्वराशिवाय तिच्याच धाकट्या बहिणीच्या,आशाच्या स्वरातील  असामान्य सामर्थ्य ओळखून त्यातून सुरेल सुरांचे अवकाश निर्मिले....!!!!ओंकारप्रसाद नय्यर....हाच तो सुरांचा जादूगार...आज त्यांचीच जयंती...!!!त्यांना लक्ष लक्ष प्रणाम....!!

नय्यर साहेबांचे संगीत म्हणजे मूर्तिमंत चैतन्य....त्यांचे संगीत म्हणजे सतार, सारंगी, संतूर ,मेंडोलीन ,गिटार,पियानो यांचा मोहक,रोमांचित करणारा स्वर झुला....ज्याच्या सुरेल हिंदोळ्यावर आपण हरवून जातो ....लक्षात राहते फक्त ती धून....ते वाद्य तरंग....किती गीते सांगावीत ..."आज कोई प्यार से"मधील सतार ,व्हायोलिन आणि संतुर यांची जुगलबंदी आणि आशा ताईंचा स्वर यांचा विणलेला  सुंदर स्वर-गोफ विलक्षण सुंदर...!!! "बहोत शुक्रिया बडी मेहेरबानी" या "बिनाका"मध्ये गाजलेल्या गीतातील "बाबू सिंग" यांनी वाजविलेले हार्मोनियम चे पीस ऐकून मन त्या सुरावटीवर डोलू लागते...."काश्मीर  की कली" मधील "दीवाना हुआ बादल" मधील मेलडीची परिसीमा पाहिली की मन थक्क होते...त्या सुरात न्हाऊन निघते...!!!!"पुछो ना हमें हम उनके लिये",मेरी नींदो में तुम","आप के हसीन रुख पे आज नया नूर है"  मधील "पियानो" ची केलेली "कशिदाकारी" पाहून  मन हरखून जाते .सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या नय्यरजींनी"हम ने तो दिल को आप के कदमो में रख दिया"या युगलगीतात केलेला "इलेक्ट्रिक बिन" या नव्या वाद्याचा वापर उल्लेखनीय...!!!! ओपी यांचे सहायक "कोहली" हे त्यांचा रिदम सेक्शन सांभाळत..."गुरुशरण कोहली "यांची घुमारेदार ढोलकी त्यांच्या गीतात बहार आणत असे...."दो उस्ताद" चित्रपटातील "हम पे दिल आया" हे गीत याची सुरेल साक्ष देते....तसेच "हजारा सिंग" आणि "श्री दिलीप नाईक "यांची  थक्क करणारी "मोहोब्बत कर लो जी भर लो" किंवा "अजी किबला मोहोतरमा"  या गीतातील गिटार केवळ लाजवाब....!!!!"गणिकेच्या माडीवरील सारंगीला दिवाणखान्यात मानाचे स्थान मी मिळवून दिले "असे खुद्द नय्यरसाहेबानी  एका मुलाखतीत सांगितले आहे....."कही पे निगाहे,कही पे निशाना"यातील "पंडित रामनारायण" यांच्या सारंगीचे मीन्ड काम पहा कित्ती सुंदर सजविले आहे....

ओपींचा जन्म लाहोरचा.....१६ जानेवारी १९२६ ......संगीताचे संस्कार आईच्या पोटात असतानाच झालेले....त्यांच्या खेपेस आईला हार्मोनियम ऐकण्याचे आणि वाजविण्याचे डोहाळे लागले होते....ओंकारप्रसाद जणू गर्भातील ते  सूर घेऊनच जन्मले.....तीन भाऊ,एक बहिण ,आईवडील असे त्यांचे सुसंस्कृत कुटुंब.....अभ्यासापेक्षा त्यांना गाण्यात अधिक रुची....!!!!!"कुंदनलाल सैगल" आणि "पंकज मलिक" हे त्यांचे आवडते गायक.शाळेत असताना ओपींनी अनेक स्नेह संमेलने गाजविली .लाहोर रेडिओ स्टेशनवर होणाऱ्या मुलांच्या कार्यक्रमात गाणी म्हटली."दुल्हा भट्टी" या "रूप शोरी" यांच्या चित्रपटात "इन दी जानव विचो "हे गीत गोविंद राम यांच्या संगीत दिग्दर्शनात गाण्याची संधी त्यांना लाभली.अवघ्या १७वर्षांच्या वयात त्यांना एच एम व्ही साठी स्वत: संगीत दिलेली "कबिर वाणी" गाण्याची संधी मिळाली.एक प्रायव्हेट कंपोझिशन "प्रीतम आन मिलो" जे त्यांनी सी एच आत्मा यांच्याकडून गाऊन घेतले ,जे कमालीचे लोकप्रिय झाले,आणि आजही ते लोकप्रिय आहे.याच्याच लोकप्रियतेने प्रभावित होऊन श्री पंचोली यांनी नय्यर साहेबाना संगीतासाठी बोलवायचे ठरविले.पण देशाच्या फाळणीने सारेच विस्कळीत झाले..नय्यर यांनाही लाहोर सोडून पतियाळा ला संगीत शिक्षक म्हणून यावे लागले आणि नंतर त्यांनी मुंबई गाठली.

नय्यर यांच्या सांगीतिक कारकीर्दीकडे पाहिले तर १९५३ ते १९६० या पहिल्या टप्प्यात त्यांच्यावरील पंजाबी लोकसंगीताचा तसेच "पंकज मलिक" आणि "तिमिर बरन" यांच्या गायकीचा प्रभाव जाणवतो...१९६१ ते १९७३ हा त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ...यात त्यांच्या संगीतातील मेलडीने गाठलेला कळस मन तृप्त करतो, तसेच विविध राग आणि प्रामुख्याने भारतीय वाद्ये यांचा चपखल वापर मन थक्क करून टाकतो...१९७३ नंतर मात्र ते काहीसे हरवलेल्या स्थितीत दिसतात...आशा रफी यांच्या स्वराअभावी त्यांचे संगीत सुने झाल्यासारखे वाटते..!!

 आपल्या सांगीतिक कारकिर्दीत नय्यर साहेबांनी स्त्री गायिकात प्रथम गीता दत्त,शमशाद बेगम आणि नंतर आशा भोसले यांच्या स्वरांनी आपले संगीत बहरवले.आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी "कनीझ''या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताने केली.स्वतंत्रपणे संगीत देण्याची संधी त्यांना १९५२ मध्ये ''आसमान"या चित्रपटाने दिली.या चित्रपटाचे निर्माते दलसुख पंचोली यांनी "आसमान" मधील गीतांसाठी "लता" आणि "गीता" असे दोन पर्याय दिले होते..."आपण द्याल ती" असे उत्तर नवख्या नय्यर यांनी दिले .पंचोलीनी "गीता" दिली आणि या  थोड्याशा अनुनासिक ,मर्यादा असलेल्या पण मुक्तपणे गाणाऱ्याआणि उत्तम शब्दांची फेक करणार्या  स्वराला सुद्धा नय्यरजींनी छान पैलू पाडले...आणि "आसमान" मधील सतारीने बहरलेले "देखो जादुभरे तोरे नैन", "पो पो पो बाजे बाजा ढोलक" (या गीताजींनी  गायिलेल्या गीताच्या संगीतातील एक तुकडा बिनाका गीत मालेच्या शीर्षक संगीतात घेण्यात आला होता. ) "नीले आसमानी"( मिस्टर अँड मिसेस 55-क्लबसोंग),"प्रीतम आन मिलो"( मिस्टर अँड मिसेस 55- विरहवेदनेने भिजलेल्या स्वरात गायलेले),"ठंडी हवा काली घटा"( मिस्टर अँड मिसेस 55-लोकसंगीताचा बाज ल्यालेले),""रात नशिली"( छुमंतर-नशिले प्रेमगीत), "जाता कहा है दिवाने",(सी आई डी)","कैसा जादू बालम तू ने डारा",(12 ओ क्लोक),"मेरा नाम चुन चुन चू"(क्लब सोंग-हावडा ब्रिज) यासारख्या गीतातून गीताजींनी नय्यरी संगीत खुलविले होते .१९५४ साली आलेल्या गुरुदत्त यांच्या "आरपार" चित्रपटात "ब्रिन्ग क्रॉसबी "च्या रेकॉर्ड्स वर  आधारित असलेले संगीत अनुपम होते...मादक स्वरात गीताजींनी  गायलेल्या आणि सोबत अकॉर्डियन चे मधुर स्वरवलय घेऊन आलेल्या  ''बाबूजी धीरे चलना''या गीताने लोक वेडे झाले.रातोरात नय्यर यशकीर्तीच्या  उत्तुंग शिखरावर विराजमान झाले.

"आरपार "हे त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील पहिले मानाचे पान!!!!.....यातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली जसे.... "झिंग झिंग झिंग" या सॉंग वरून घेतलेले "सुन सुन सुन सुन जालीमाँ","मोहोब्बत कर लो जी "या गीतातील अवखळ प्रेम,"ये लो मैं हारी पिया" मधील प्रियाराधन करणारा गीताचा लाघवी स्वर,"हूँ अभी मैं जवा" या क्लब सोंग मधील "नशा" आणि "पिलू "रागावर आधारित शमशादजीनी गायलेले "कही आर कहीं पार"मधील  स्वरातील  दमदारपणा आणि नय्यरी संगीत यांचा जणू अनोखा मिलाप झालेला दिसतो....."गीता" प्रमाणे "शमशाद बेगम" यांनीही नय्यर यांना मोलाची साथ दिली.."बूझ मेरा क्या नाम रे"(सी आई डी),"जरा प्यार कर ले बाबू"(मंगू),"कही पे निगाहे,कही पे निशाना"(सीआयडी),"लेके पहला पहला प्यार",(सी आई डी)"रेशमी सलवार कुर्ता जाली का"(नया दौर),"कजरा मोहोब्बत वाला"(किस्मत ,आशाजींच्या साथीने)अशी अनेक गीते शमशाद यांनी आपल्या खणखणीत स्वरात गाऊन  आणि जगाने त्यांच्या विरुद्ध पाठ फिरविल्यावर ही शमशाद ने  "मेहबूबा" चित्रपटातील गीते गाऊन त्यांची साथ दिली...नय्यर यांना "शमशादजींचा" स्वर म्हणजे "चांदीचे खणखणीत नाणे" वाटे,तो स्वर त्यांना मंदिरातील "घंटानादाची" आठवण करून देई. काळ बदलला होता... जणू चैतन्यमयी "नय्यर युगाला" प्रारंभ झाला होता.....!!!!!

नय्यर साहेबांच्या संगीताचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर त्यात मादकता होती,आशयघनता ,नशा होती,जोश होता......पाश्चात्य तसेच भारतीय वाद्यांचे बेमिसाल मिश्रण असायचे....तीच गोष्ट तालाची....कधी मुखड्यात पाश्चात्य ताल तर अंतऱ्यात भारतीय केहरवा ताल....त्यांच्या गाण्याच्या ठेका नेहमीच "भाव" खाऊन जायचा... पंडित उल्हास बापट म्हणतात की विशेषत: ढोलकीच्या किनारीवर अंगठी मुळे येणारा नाद उमटला की "क्या बात है "हे आपसूक यायचेच...(उदा. द्यायचे तर "बुझ मेरा क्या नाव रे"...सी आई डी)त्यांच्या गीतांमध्ये तर कधी कधी गायक आणि वाद्य यांची सुरेल जुगलबंदी आढळते... (रफी-सेक्साफोन -ये दुनिया उसीकी....), तसेच मूळ गीत सुरु व्हायच्या आधी अतिशय गॊड अशा काही ओळी म्हटल्या जात...त्यांना "कता"म्हणत...("आओ हुजूर तुमको" आठवा)त्यानंतर गीत सुरु झाले की ते विलक्षण सुंदर वाटे....काही वेळा मूळ गीत सुरु होण्याआधी गोड मेलडीची साद असे जी कान तृप्त करीत असे उदा....पुकारता चला हूँ मैं....!!!त्यांचे संगीत पंजाबच्या गायकीने प्रेरित होते...दस्तुरखुद्द श्री शिवकुमार  शर्मा यांनी  श्री सतीश पाकणीकर यांच्या ओ पी नय्यर यांच्यावरील  पुस्तकात त्यांच्या गायकीविषयी म्हटले आहे की  ते "बिडार" अंगाने म्हणजे "तीव्र आणि कोमल स्वर" एकसाथ उपयोगात आणायचे..हे पंजाबी गायकीचे खास अंग होते ,त्यामुळे गाणे अधिक मधुर होई.तसेच गाण्यातील भाव जाणून त्याप्रमाणे संगीत आणि शब्दांची फेक असे..त्यांचे उर्दूवरील प्रभुत्व वाखाणण्यासारखे..स्वतः उत्तम गायक होते..शायरीची समज होती .स्वर लावण्याची खासियत त्यांना आत्मसात होती.  त्यांच्या संगीतात सर्व प्रकारची गीते आढळतात...त्यात टांगा गीते(मांग के साथ तुम्हारा,बंदा परवर),कव्वाली सदृश गीते...(कजरा मोहोब्बत वाला,ओ यार जुल्फोवाले),भांगडा गीते....(मेरी जान बल्ले बल्ले,उडे जब जब तेरी जुल्फे),काही क्लब गीते...(मेरा नाम चुन चुन चू,अरे तौबा अरे तौबा)योडलिंग गाणी (सुरमा मेरा निराला, पिया पिया पिया)

नय्यरजी आणि आशाजी यांच्या सांगीतिक गानप्रवासाला "छम छमा छम"पासून सुरवात झाली....पी एल संतोषी यांच्या "मोहनतारा स्टुडिओ" मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती....नय्यर यांनी "रात कि रानी "मधील त्यांची  गाणी  ऐकली होती......तेव्हा आशाजी गीता दत्त आणि लतादीदी यांच्या गायकीने प्रभावित होत्या,"लतादीदींसारखे गाणे" हे त्यांचे स्वप्न...पण त्यांची "स्वतःची"  अशी वेगळी शैली होऊ शकते याची जाणीव त्यांना नय्यरजींनी करून दिली... गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग असा स्वर होता तो....नय्यर साहेबांच्या मोहिनी घालणाऱ्या संगीताची साथ मिळाली आणि तो स्वर उंच उंच झेपावला ,अगदी दुप्पट आत्मविश्वासाने.... नय्यर साहेबांच्या संगीताने जणू त्यास नव संजीवनी मिळाली ,एक नवा आत्मविश्वास दिला.बडे गुलाम अली खान साहेबांनी गायलेली एक ठुमरी "का करू सजनी"ही एकदा आशाताईंच्या नकळत नय्यर यांनी रेकॉर्ड केली आणि त्यांना ऐकविली...ती त्यांनीच गायली यावर त्यांचा विश्वास बसेना...त्या आभाळाएवढ्या आत्मविश्वासाने आणि नय्यरजींच्या संगीताने एक अनोखे भाव विश्व निर्माण झाले....आशाजींचा  "उत्कृष्ट बेस(खर्ज) आवाज","हरकती,मुरक्या लीलया अवगत करणारा तयार गळा",आणि "भान हरपून गाण्याची वृत्ती" यामुळे स्वर्गीय संगीत निर्माण झाले... !!!!

त्या संगीतात कधी त्या मुग्ध प्रेमिका होत्या तर कधी कोठीवरील गणिका,कधी विरहदाह साहणारी नायिका तर कधी क्लब डान्सर...सगळ्या भावना उत्कटपणे व्यक्त करत त्यांनी नय्यर संगीतास चार चांद लावले..   रसिक त्या स्वर्गीय संगीतात ,स्वरात चिंब चिंब झाले.....गाणी तरी कित्ती सांगायची....."जाईये आप कहा जायेंगे मध्ये आशाजींचे आलाप जणू वाद्यच बनून अवतरतात,"आँखो से जो उतरी है दिल में "मधील "अल्लड प्रेमाची जाणीव त्यांनी "हंसध्वनी" रागाच्या सुरावटीतून करून दिली."मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूं "मधील खर्जाचे सामर्थ्य,"यही वो जगह है "म्हणजे जणू आठवणींच्या गडद सावल्यांची संगीताच्या साथीने विणलेली घट्ट वीण...,"रातों को चोरी चोरी" ही काफीच्या सुरावटीतील सुंदर रचना,त्यातील विरह वेदना मनाला  चटका लावून जाते,"कोई कह दे कह दे"हा पहाडी रागातील संतुरच्या मोहक स्वरांचा फुलोरा आणि  केलेला प्रेमाचा इजहार ,"ये है रेशमी झुल्फो का अंधेरा" मधील "मादकता","बलमा खुली हवा में" मधील "बेहोशी" ,"आओ हुजूर तुमको" मधील आशाजींचा धुंद स्वर ,आलाप,हास्य,शायरीचे बोल यांची उत्तम गुंफण  ,याच गीताने "नूर देवासींना" नाव लौकिक मिळवून दिला... ,"चैन से हम को कभी" मधील भळभळणारे दु:ख जे हरिजींच्या बासरीच्या साथीने उभरते आणि पुन्हा एकदा नय्यरी संगीतातील न्यू थिएटर्स ची छाप जाणवून देते ...गीतातील शांतता जणू   त्यातील व्यथा  बोलकी करते...!!!! अनेक रंगी भाव,वेगवेगळ्या नायिका आणि चित्रपट..... स्वर मात्र एकच आशाजींचा आणि संगीत होते नय्यरांचे....ज्यातून सौंदर्य,नाद,जोश ,धुंदी,नव चैतन्य प्रकटत असे आणि या दोहोंच्या मिलापातून चंदेरी गानविश्व साकारत असे......!!!!!!

नैय्यर साहेबांनी विधिवत गंडा बांधून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नव्हते...तरीही "फागुन"चित्रपटातील सर्वच्या सर्व म्हणजे 12गाणी त्यांनी "पिलू"रागात बांधली.हे एक आश्चर्यच नव्हे का.....??ही गीते ऐकून सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक "अमिर खान" यांनी त्यांची प्रशंसा केली होती....."हे कसे काय झाले?" असे खान साहेबांनी विचारताच नय्यर साहेबांचे उत्तर एकच होते..."सब उसकी देन है...!!"एक परदेसी मेरा दिल ले गया","तुम रूठ के मत जाना","मैं सोयी अखियां मिचे"ही युगलगीते आजही लोकप्रिय आहेत."मैं सोया अखियां मीचे" ची बात काही औरच...!!!!आशाजी आणि रफिजी दोघांचे सॉफ्ट स्वर,आशाजींचे आलाप हाच  वाद्यवृंद,शुद्ध कोमल स्वरांची जादू लाभलेले अतिशय रोमँटिक गीत....!!!!तसेच "रागिणी"चित्रपटात त्यांनी दिनानाथांच्या "सुकतातची जगी या" या बंदिशीवरून "तिलंग" मधील"छोटासा बालमा "हे सुंदर गीत बांधले ज्यात दोन्ही गंधार आणि निषाद जादू करतात, ठुमरी अंगाचे हे आशाजींचे उत्कृष्ठ गीत...!!! ...तसेच "मन मोरा बावरा "हेही रफींनी गायिलेले गीत "तिलंग" मधील होते,जे त्यांनी किशोर कुमार साठी गायले."कल्पना" चित्रपटात त्यांनी रफी आणि मन्ना डे यांच्या स्वरात "तू है मेरा प्रेम देवता"हे गीत बांधले...पण खरी कमाल होती आशाजींनी गायलेल्या "देस"रागातील "बेकसी हद से जब गुजर जाये"या गीतात...."पंडित राम नारायण" यांच्या सारंगीच्या साथीने, संगीताने आणि आशाजींच्या कमाल गायकीने जणू आत्म्याला स्पर्श केला होता...."एक मुसाफिर एक हसीना "यातील गीतातही त्यांनी रागदारीचा वापर केला."आप युंही अगर हम से मिलते रहे "या केदारवर आधारित गोड गाण्यात आजही जीव गुंतला आहे तसेच "मैं प्यार का राही हूँ" मधील तीव्र कोमल स्वरांची जादू पुन्हा एकदा बहरत आहे..."अकेली हूँ मैं पिया आ"हे "संबंध" चित्रपटातील आशाताईंचे गीत म्हणजे सहा रागांची सुरेल घट्ट  गुंफण.जाणकारांच्या मते नय्यर साहेबांची ही सर्वोत्कृष्ट रचना...आशा ताईंच्या गायकीचा कास लावणारी...!!!!

आशा ताईंसारखाच "रफी" यांचा आवाजही नय्यर यांचा खूप आवडता...!!!!त्यांच्या संगीतात रफींचा आवाज खूप खुलला....संगीतातील जोश,ठेका,माधुर्य सगळे त्यांच्या स्वराने झळाळून गेले...जॉय मुखर्जी,विश्वजीत,शम्मी कपूर यांची कारकीर्द घडविण्यात नय्यर यांच्या बरोबर रफी यांच्या बुलंद स्वराचाही वाटा होता...रफींची सोलो गाणी पाहिली तर "युं तो हमने लाख हसी देखे है"(अवखळ पण),"पुकारता चला हूँ मैं"(सच्चे प्रेमगीत), "दिल कि आवाज भी सुन","तारीफ करू",(रफीजींच्या खुल्या स्वरात बहरलेले गीत ,यातील "तारीफ करू" मधील वैविध्य वेड लावणारे),"है दुनिया उसिकी","आप के हसीन रुख पे","जवानिया ये मस्त मस्त बिन पिये", "सर पर टोपी लाल" या गीतात रफींचा रांगडा स्वर खूप छान वाटायचा...!"पुकारता चला हूँ मैं "हे गीत तर वेगळ्या विश्वाची सैर घडविणारे,स्वर मंडलाच्या साथीने बहरलेले... याची लय एखाद्याच्या चालण्याइतकी नैसर्गिक..वसंत देसाईंचे आवडते गीत ...!!!"चल अकेला" हे संबंध चित्रपटातील गीत आशाताईंच्या आग्रहाने मुकेशजींना मिळाले,आणि मुकेशजींनी त्यास अजरामर केले...."प्यार पर बस तो नहीं" या "सोने की चिडीया" मधील युगलगीताने प्रेमाची नवी परिभाषा दिली ,तलत आणि आशाजींचे हे गीत म्हणजे मर्म बंधातली ठेव...!!!किशोर कुमार ही "सुरमा मेरा निराला","पिया पिया पिया" अशा गीतातून चमकून गेले...!!!

नय्यर साहेबांची युगलगीते म्हणजे अप्रतिम गीत शिल्पे....!!!!मनावर मोरपीस फिरवावे किंवा गुलाबपाण्याचा शिडकावा करावा तितकी नाजूक....सुगंधी...मनात जपण्यासारखी..!! "काश्मीर की कली"हा तर त्यांनी निर्माण केलेला सुरांचा स्वर्गच.....!!!!यातील "इशारो इशारो में दिल लेनेवाले"तील गोड इशारा मन सुगंधी करून टाकतो  तर  "दिवाना हुआ बादल" पुन्हा  असा बरसतो की हरकती ,मुरक्यांची बरसात होते... !!! "सी आई डी "मधील "आँखो हि  आँखो में इशारा","जादूनगरी से आया है कोई जादूगर"ही गीते स्वप्ननगरीची सैर घडवितात तर "तुमसा नही देखा" मधील "देख कसम से "आपण आपल्याही नकळत गुणगुणू लागतो...त्यातील "हां"चा लाडिक नखरा मन मोहून टाकतो..."एक मुसाफिर एक हसीना" मधील सगळीच गीते अप्रतिम...!!! "बहुत शुक्रिया" ,मैं प्यार का राही","आप युं ही अगर हम से "आणि "इराण हम ने देखा"ने आपण वेडावून जातो...!!! "सोने कि चिडीया" या थोड्या गंभीर विषयावरील चित्रपटासाठी त्यांनी तलतजी आणि आशा ताई यांच्या स्वरात "सच बता तू मुझपे फिदा" आणि "प्यार पर बस तो नही"ही दोन अविस्मरणीय आणि कथानकाला साजेशी अशी द्वंद्व गीते दिली....जी आजही सर्वश्रेष्ठ गणली जातात... "प्यार पर बस तो नहीं" मध्ये सुंदर कवितेला हलक्या सुरांची जोड दिली आहे...मुशायऱ्यात जसे गीत गुणगुणत गातात तसेच हे सुंदर गीत...!!आशाजींची मृदू आलापी केवळ अविस्मरणीय...!!!!आशाजीं प्रमाणे त्यांनी गीताजींबरोबर हि "उधर तुम हसी हो"हे वॉल्टस च्या रिदम ने रंगलेले गीत,"आँखो हि आँखो में इशारा","मोहोब्बत कर लो जी कर लो","यहां हम वहा तुम" हे बहारदार अदा दाखविणारे गीत,"अच्छा जी माफ कर दो" मधील अवखळपणा, "थोडासा दिल लगाके देख" यातील "तारारा रंपम "ची जादू,"जहाँ जहाँ खयाल जाता है "हे व्हिसलिंग च्या साथीने रंगलेले गीत तसेच "ठंडी ठंडी हवा" हे आशा-गीताने गायलेले गीत म्हणजे एकॉर्डियन च्या कॅनव्हास वर व्हायलीनच्याआणि बासरीच्या  रंगाने आणि आशा गीताच्या स्वरेल ब्रशने चितारलेले रमणीय चित्रच होय...!!!!"झुका झुका के निगाहे मिलाए जाते है"हे मुकेश-आशा चे गीतही अवीट गोडीचे आहे..."झुल्फ की छाव में चेहरे का उजाला लेकर" हे आशा-रफी यांचे युगलगीत शायराना अंदाज दाखवते आणि तरन्नुम मध्ये गायले आहे..."!! जाने जिगर,युं ही अगर" या "मुजरीम" मधील गीताचा "कर्नाटकी बाज" थक्क करतो .पंजाबी नय्यर कर्नाटकी ढंग सुंदर फुलवितात.."तुम रुठ के मत जाना" मधील पंजाबी टप्प्याची झलक ,आर्तता पाहून काळीज हेलावते.."हाथ आया है "या गीतातील वेगळेपण आणि मेलडी कान तृप्त करते."बसंत" मधील "जी चाहता है खिच लू तसवीर आपकी"मधील "खिंsच"हा शब्द आशाताईंनी इतका सुंदर म्हटलाय की क्या कहने...!!!! "फिर मिलोगी कभी "यातील रफिंचा मृदू स्वर,सतार सरोदची जुगलबंदी,पंजाबी संगीतातील माधुर्य सारेच अविस्मरणीय...!!!! "मिलती है अगर, नजरोसे नजर"(दो दिलों की दास्तान )मधील आशा रफी यांच्या गायकीतील नजाकत ,नखरा अनुभवावा आणि म्हणावे खरच "क्या बात है इस जादूगारकी"....!!!!!

 गायकांमध्ये प्रामुख्याने रफिजी आणि नंतर महेंद्र कपूर अशा गायकांच्या स्वर साथीने त्यांनी आपले संगीत फुलविले.''लता मंगेशकर''या मधुर स्वराशिवाय संगीत क्षेत्रात उभे राहण्याचे धाडस करणारे ओपी हे एकमेव संगीतकार....!!!!!त्यांनी त्या स्वराशिवाय आपली कारकीर्द यशस्वी करून दाखविली हा चमत्कारच नव्हे का??रफिजी आणि नय्यरसाहेब यांच्यात जर वाद झालेच नसते तर आणखी कितीतरी गीतांची मेजवानी रसिकांना मिळाली असती.रफींचा स्वर नय्यर यांच्या संगीतातून उणा झाला आणि रसिक नाराज झाले.(काही वर्षांनी रफी आणि नय्यर रफिंच्या पुढाकाराने एकत्र आले ते देब मुखर्जींच्या "ऐसा भी होता है" या चित्रपटात...."ये दूरी अभी बरदाशत नहीं होती "असे म्हणून दोघांची गळाभेट झाली...अबोला संपला...पण रफिंचा स्वर नय्यरसंगीत पुन्हा उजळू शकला नाही....)काही कालावधीनंतर आशाजी आणि नय्यर साहेब यांच्यातही बिनसले आणि एक सांगीतिक विश्व भंगले...रसिक हळहळले....पण नियतीपुढे आपण पराधीन असतो....

चित्रपट कलाकार कोण आहेत हे पाहण्यापेक्षा संगीत ओपींचे आहे हे पाहून रसिक चित्रपट पाहत असत.त्यांच्या नावावर चित्रपट विकले जात.....त्यांच्या मदमस्त संगीताने अनेक कलाकारांच्या कारकिर्दीला बहारदार वळण लागले.आपल्याच मस्तीत आयुष्य जगणारा हा कलंदर कलाकार....अत्यंत वक्तशीर,शिस्तीचा भोक्ता...आपल्या वादकांबद्दल कमालीची आत्मीयता असणारा...त्यांना आपलं मानून ,योग्य तो मान देणारा आणि  वेळेवर मानधन देणाऱ्यात नय्यरजींचा पहिला क्रमांक ....!!!! "तत्वापुढे व्यवसायिकतेशी तडजोड करणे" त्यांना कधीच मान्य झाले नाही. "मोडेन पण वाकणार नाही" हा त्यांचा बाणा... आणि त्यावर ते शेवटपर्यंत दृढ राहिले.

 आपण या  इहलोकी पराधीन ठरतो...अगदी नियतीच्या हातातील निव्वळ प्यादी..!!!नियती कधी आणि कशी चाल खेळेल ते सांगता येत नाही... एके काळी चित्रपटासाठी "एक लाख" रुपये मानधन घेणाऱ्या नय्यरजींच्या आयुष्याच्या संध्यासमयी मात्र वनवास होता.पत्नी आणि मुलांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटेनासा झाल्यावर सगळी संपत्ती त्यांच्या स्वाधीन करून नेसत्या वस्त्रानिशी,आपली हार्मोनियम आणि नोटेशनच्या वह्या घेऊन त्यांनी आपला राजमहाल सोडला...बरीच वर्षे ते विरारला राहत होते...शेवटी ठाण्यात नाखवा कुटुंबात राहिले...तिथेही त्यांचा मान  तसाच राखला गेला ..ते पांढरेशुभ्र परिटघडीचे कपडे,ती फेल्ट हॅट,सोनेरी काडीचा चष्मा, चेहऱ्यावरचा तो दरारा.. सारे काही तसेच होते...त्यांनी सुरांची साथ सोडून होमिओपॅथी जवळ केली..संगीतकार नय्यर हरवून डॉक्टर नय्यर अवतरले होते... नाखवा कुटुंबीयांनी प्रेमाच्या धाग्यांनी त्यांना बांधून ठेवले...त्यांची मुलगी राणी हिच्यावर मुलीसारखे प्रेम त्यांनी केले...आलीशान महालातील राजा तीन खोल्यांपैकी एक खोलीत राहत होता...पण त्याचा स्वाभिमान,तत्वे मात्र अभंग होती..

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी,
आठवणींची होई दिवेलागण
सरल्या नभाची सूर्यास्तछाया,
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण

सुरेश भटांच्या काव्यात थोडा बदल केलाय ....आयुष्याच्या पैलतीरी त्यांची कसलीही तक्रार नव्हती...प्राप्त परिस्थिती त्यांनी मोठ्या हिमतीने तोलली होती....अनेक आठवणी मनात गर्दी करत...आयुष्यातील अनेक कटू प्रसंग आठवत ,पण आता ते सगळ्याच्या पल्याड गेले होते...पैलतीर दिसू लागला होता.....!!!!

शेवटच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज पडावे, आणि सरावा प्रवास सारा!

"आरती प्रभूंच्या" या कवितेतील भावाप्रमाणे त्यांच्या मनाची हळवी अवस्था झाली होती...कधी प्रतिस्पर्धी संगीतकारांनी खेळलेले डावपेच आठवत,पण आता मनात राग नव्हता..किती वेळा त्यांचे संगीत अयशस्वी ठरावे,त्यांची गीते आकाशवाणीवर वाजू नयेत  असेही प्रयत्न झाले ,पण नय्यरजी खंबीर होते...सगळ्याला त्यांनी यशस्वी रित्या तोंड दिले...खंत होती एकाच गोष्टीची ...ज्या "गीताने" त्यांच्या संगीतावर मनापासून प्रेम केले,त्या गीताला तिच्या पडत्या काळात त्यांनी गाणी दिली नाहीत...तिला विसरल्याची सल त्यांच्या मनी कायम राहिली...चित्रपट कुठला "ए "की "बी" ग्रेड चा ते न पाहता त्यांनी आपले उत्तम संगीत निर्मिले..."काश्मीर की कली","एक मुसाफिर एक हसीना","फिर वही दिल लाया हूँ","सी आई डी","नया दौर","किस्मत","तुमसा नही देखा" ही त्यांच्या सोनेरी सुरेल संगीताने नटलेली काही पाने...!!!!नाखवा कुटुंबाचा एक आदरणीय सदस्य बनून ते राहिले..कालांतराने नव्या ,प्रशस्त घरात नाखवा कुटूंबीय राहावयास गेले...मोठे घर पाहून नय्यरजी आनंदून गेले ,पण हा आनंद फार काळ टिकला नाही..सगळ्या जगाशी एकाकी झुंज देऊन जणू त्यांचे शरीर थकले होते,आणि त्यात आपल्या माणसांकडून झालेल्या जखमांनी वर्मी घाव घातला होता..त्यावर त्यांची सुरांची दुनियाही मलमपट्टी करू शकली नाही.२८जानेवारी २००७ मध्ये त्यांची प्राणज्योत मालविली...सारे रेशीम बंध आधीच सैलावले होते...आप्तेष्ट असूनही एखाद्याला आपल्याच अंत्ययात्रेची तयारी करायला लागावी ...काळीज दुभंगणारी गोष्ट...!!!

ही सिनेसृष्टी मायानगरी आहे...इथे उगवत्या सूर्यास नमन असते...इथे उपकारांची जाणीव असतेच असे नाही...संगीताच्या '' जादू नगरीचे ते खऱ्या अर्थाने जादूगारच" होते.लय,ताल,हरकती, मुरक्या,इंटरल्युड्स,मोठे अंतरे,तालाची विविधता सगळ्यात ते अग्रेसर होते....त्या विधात्याने जे  प्रतिभेचे भरभरून दान दिले ,ते इहलोकीचे प्रतिस्पर्धी कसे मिटविणार..??..आपल्याच धुंदीत दिमाखाने चमकत असलेला तो अढळ असा ध्रुव तारा होता....!!!आजही तो संगीताच्या नभांगणात तसाच लखलखत आहे...आपल्या संगीताची मोहिनी रसिकांवर आजही तशीच घालत आहे....!!!इतकी वर्षे झाली तरी "आप युं ही अगर हम से मिलते रहे" ची मेलडी तसूभरही कमी झाली नाही..."नय्यर यांनी सच्च्या भावनांना संगीताने उजळविले ,शब्दांना नव्हे"... असे प्रत्यक्ष गीताजींनी म्हटले आहे..."संगीत माझ्या रक्तात आहे...मी कंपोझर होतो, आहे आणि जगाचा निरोपही कंपोझर म्हणून घेईन..."हे नय्यरसाहेबांचे शब्द..."पचास के दशक में बहोत घोडे संगीत के रेस में दौड रहे थे ,उसमें एक गधा भी था...खुदा मेहेरबान तो गधा पहलवान.".असे ते नेहमी म्हणत आणि हसत....!!!आपले यश "तेरा तुझको अर्पण" या न्यायाने त्या जगनियंत्याला बहाल करत..

लय,ताल,हरकती,मुरक्या,मधुर स्वर,माधुर्य यांनी सजलेली ही सुरांची वाट आजही तशीच सुगंधी आहे....पुकारते आहे...कित्येकांची आज प्रेरणा बनली आहे...सुरांचा निखळ आनंद आजही पांथस्थाना भरभरून देत आहे...आजही मन त्या सतार सारंगीच्या झुल्यावर आणि ढोलकच्या तालावर अलवारपणे  झुलत राहते आणि म्हणते ''तुमसा नही देखा ''नय्यरजी...तुम सा नही देखा............!

    मानसी पटवर्धन

माननीय सिराज भाई,
         किशोरजी से आप का मेल लेकर नय्यर साहेब पर लिखी हुई पोस्ट आप को भेज रही हूँ।मुझे मालूम नहीं की आप मराठी समझते है या नहीं, फिर भी भेज रही हूँ।

मानसी पटवर्धन,डोंबिवली